मुंबई – सध्या संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘सबसे कातील गौतमी पाटील…’ दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.
गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. मात्र, नेहमीच तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडले असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती एका सामाजिक संघटनेला मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी जाऊन या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे मिळून आलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील ‘रवींद्र बाबुराव पाटील’ असल्याचं समोर आलं आहे.
त्यानंतर रविंद्र पाटील यांच्या भावजाई शोभा आनंद नेरपगार (पाटील) या त्यांच्या मुलीसह रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. सध्या रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप तरी गौतमी कडून याबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.
गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून मुलगी आणि पत्नीपासून वेगळे राहत आहेत. कौटुंबिक वादामुळे गेली अनेक वर्षे त्यांची भेट झालेली नाही. गौतमी वादात सापडलेली असताना रवींद्र पाटील यांनी माध्यमांसमोर येत तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षाही रवींद्र पाटील यांची आहे.