नगरमध्ये बहुतेक ठिकाणी दुरंगीच लढती

उद्या माघारीनंतर बाराही मतदारसंघाचे चित्र होणार स्पष्ट : तिरंगी लढतीची दोन-तीन ठिकाणीच शक्‍यता

अहमदनगर:  विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात बारा जागा असून यातील बहुतेक ठिकाणच्या लढती निश्‍चित झालेल्या आहेत. मात्र,सोमवारी दि.7 दुपारी अर्ज माघारीनंतरच या बाराही ठिकाणचे चित्र आणखी स्पष्ट होईल. बहुतेक ठिकाणी दुरंगीच लढती रंगतील.दोन-तीन मतदारसंघातच बंडखोरांनी माघार न घेतल्यास तिरंगी लढती होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.सर्वच मतदारसंघात दोन वा तीनपेक्षा अधिक उमेदवार दिसत असले तरी चौरंगी लढत एकाही मतदारसंघात होणार नाही.

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतच बऱ्याच लढती स्पष्ट झाल्या होत्या.पक्षांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यावर हे गणित आणखी सुकर झाले. आता अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्रच समोर येईल. पारनेर,कोपरगाव व नगर शहर वगळता इतर कोठे तिसऱ्या उमेदवाराचे अस्तित्व उपद्रव्यमूल्य दाखवेल असे तरी आजचे चित्र नाही. श्रीरामपूरमधून खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे यांनी माघार घेत पक्षाचेच काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. येथे सेनेचे भाऊसाहेब कांबळे व कॉंग्रेसचे लहु कानडे या दोघांव्यतिरिक्त कुणी तगडा उमेदवार दिसत नाही. श्रीगोंद्यामध्ये भाजपचे बबनराव पाचपुते व राष्ट्रवादी कॉंग्रसचे घनश्‍याम शेलार यांच्यात दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.

तालुका व उमेदवार संख्या
नगर शहर 14 , पारनेर 9, कोपरगाव 22, अकोले 6, संगमनेर 11, शिर्डी 8, श्रीरामपूर 32, नेवासा 20 ,शेवगाव-पाथर्डी 16, राहुरी 12, श्रीगोंदा 16, कर्जत-जामखेड 16

कोपरगावमध्येनगराध्यक्ष विजय वहाडणे यांची उमेदवारी भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल. पारनेरमध्ये सुजित झावरे यांनी विखे यांचा आदेश मानण्याचे संकेत दिले आहेत. विखे वेगळा निर्णय घेण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. त्यांच्यावर सर्व बारा जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री व पक्षाने दिली आहे. राहुरीत अन्य उमेदवारांकडून कर्डीले वा प्राजक्त तनपुरे यांचे खूप नुकसान होईल अशी परिस्थिती नाही

नगर शहरात राष्ट्रवादीचे किरण काळे वंचितकडून लढत आहेत,तर नगरसेवक श्रीपाद छींदम बसपकडून लढत आहेत.छींदमचा राठोडांना मोठा तर काळेंचा जगतापांना काही प्रमाणात तोटा होऊ शकतो.येथे माजी आमदार दादाभाऊ कळमकर व त्यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर पक्षासोबत राहणार की जगताप यांच्यावरील नाराजीतून वेगळा निर्णय घेणार हे बघावे लागेल.तर दुसरीकडे माजी खासदार दिलीप गांधी राठोडांना युतीचा धर्म निभावत साथ देतात की नाही हे अजून निश्‍चित नाही. यामुळे नगर शहर व जिल्ह्यात केवळ कोपरगावमध्ये वहाडणे यांच्या रुपाने बंडाची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अकोले मतदारसंघात भाजपचे वैभव पिचड व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण लहामटे यांच्यात सरळ लढत आहे.येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे,मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.अजित नवले यांची साथ लहामटे यांना मिळाली व संगमनेर तालुक्‍यातील जी गावे अकोले मतदारसंघाला जोडलेली आहेत तेथे मताधिक्‍य मिळाले तर लहामटे पिचड यांना जोरदार लढत देवू शकतात.पण पिचड विरोधकांमध्ये बंडाळी झाली व थोरात यांनी नेहमीप्रमाणे पक्ष कोणताही असला तरी पिचडांच्याच पारड्यात दान टाकले तर पिचड यांना अडचण येणार नाही असे चित्र आहे.

संगमनेर व शिर्डीमध्ये तर आ.बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एकमेकांसाठी बाय दिल्यासारखीच परस्थिती आहे. नेवासा येथे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे व शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांच्यात सरळ लढत आहे. येथे नरेंद्र व चंद्रशेखर घुले बंधू या माजी आमदारांच्या जोडीने तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी गडाख यांना प्रामाणिकपणे साथ दिली तर गडाख मुरकुटेंना अडचणीत अणू शकतात.

शेवगाव-पाथर्डीतही घुले बंधूंनी राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना मनापासनू साथ दिली तर ते भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची दमछाक करू शकतात. कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री राम शिंदे व शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात सरळ लढत होत आहे. रोहित गेल्या दोन वर्षापासून येथे साखरपेरणी करत आहेत. त्यांनी राम शिंदे यांच्यासमोर चांगले आव्हान निर्माण केले आहे पण शिेंदे यांना मानणारा पारंपारिक मतदार शिंदे यांच्या सोबत राहिल्यास पवारांची कसोटी लागेल.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)