अवकाळीमुळे कडधान्ये कडाडली

डाळींच्या किंमतीने गाठला उच्चांक

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्‍यात आले आहेत. मात्र तोपर्यंत धान्य व कडधान्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यंदाच्या वर्षात डाळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 60 रुपये किलो असलेली उडीदडाळ यंदा 100 रुपयांवर पोहचली आहे. यावरूनच महागाईने आतापर्यंतचे सर्व उच्चांक गाठल्याचेच स्पष्ट झाले आहे.

तूरडाळ, मूगडाळ यासह बहुतांश डाळीचे प्रतिकिलोचे भाव वाढले आहेत. तूरडाळीचे दर 95 ते 100 रुपयांवर स्थिरावले आहेत. सर्वाधिक वाढ उडीदडाळीच्या दरामध्ये झाली आहे. उडीदडाळ 100 रुपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. काही महिन्यांपूर्वी उडीदडाळीचे दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो होते. हरभरा डाळीचे दर गतवर्षीपेक्षा काही प्रमाणात कमी आहेत. मूगडाळीचा 82 रुपयांचा दर 94 रुपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. वाटाण्यामध्येही 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे. काळा वाटाण 100 रुपये तर हिरवा वाटाणा 110 रुपयांवर पोहचला आहे. मटकी 120 रुपये किलो झाली आहे. गहू, ज्वारी व तांदूळ यांच्या दरामध्ये फारशी वाढ झाली नसून तीनही धान्यांच्या दरामध्ये 4 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे.

चवळीच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. 65 रुपये किलो असलेली चवळी 80 रुपयांवर पोहचली आहे. मसूरडाळ 65 रुपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारात उपलब्ध आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतीमालाला बसला. अवकाळी पावसामुळे पीक काढणीच्या वेळेला शेतीमालांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच जो शेतीमाल अवकाळी पावासापूर्वी काढला होता त्याची साठवणूक व्यवस्थित न झाल्यामुळे त्याचे नुकसान झाले. त्यामुळे धान्य व कडधान्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई बाजारात जाणवत आहे.

नवीन आवक झाल्यावर दर उतरतील
गहू, ज्वारी यांची नवीन आवक मार्चमध्ये होते. डिसेंबर अखेरपासून नवीन तूरडाळ बाजारामध्ये येते. लातूर, उस्मानाबाद या परिसरातून तूरडाळ पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये दाखल होते. नवीन तुरडाळीसह इतर नवीन डाळींची आवक वाढल्यावरच दर कमी होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

धान्य व कडधान्यांची आवक कमी होत असल्याने भाववाढ झाली आहे. हे दर जास्त दिवस असे राहणार नाहीत. नवीन डाळी बाजारात आल्यावर दर कमी होतील.
– रुपेश भळगट, विक्रेते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)