सातारा, (प्रतिनिधी) – शाहूपुरी जुना मेढा रस्त्यावरील पुलाचे काम बंद असल्याने रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. रखडलेले पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा हद्दवाढ भागातील शाहूपुरीमध्ये जुना मेढा रस्त्यावर १२ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जुना पूल पाडून रुदीकरणासह नवीन पूल बांधण्यासाठी हा पूल पूर्णपणे पाडला आहे. खाजगी मालकाच्या जागेतून पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे.
यावेळी त्या जागेतून जाणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा लाईनला धक्का लागून ती नादुरुस्त झाल्याने शाहूपुरीचा पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत झाला होता. त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूकीचा ताण लक्षात घेता पुलाचे कामात येणारी ही पाइप लाइन शिफ्ट करुन पूलाचे काम मार्गी लागणे गरजेचे होते.
याप्रश्नी संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांशी चर्चा करून हा प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी विनंती केली होती. यानंतर१८ मार्च पासून सातत्याने संपर्क साधला जात आहे.
तथापि,पाईप लाईन शिफ्टिंगचे कामासाठी निधी कोणी खर्च करायचा यावर अद्यापही निर्णय न झाल्याने पूलाचे काम रखडले आहे. परिणामी दैनंदिन शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, नोकरी – व्यवसायाच्या निमित्ताने शहराकडे जाणारे विद्यार्थी, महिला, अबालवृद्ध नागरिकांची दळणवळणाचे बाबतीत गैरसोय होत आहे.
खाजगी मालकाने कच्च्या रस्त्यावरील धुळीचे कारण सांगून पर्यायी रस्ता बंद केला तर मोठी अडचण होऊ शकते. याठिकाणी एखादा मोठा अपघाताचा धोका सुध्दा संभवू शकतो. संबंधित यंत्रणांना पूलाचे बांधकाम त्वरित मार्गी लावण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भारत भोसले यांनी केली आहे.