सणबूर -करोनामुळे मुंबई, पुणे येथे असणाऱ्यांचे आपल्या गावी येण्याचे प्रयत्न सरू आहेत. अशाचप्रकारे मुंबईहून मिळेल त्या वाहनाने घरी पोहोचण्याचा प्रयत्न पाटण तालुक्यातील एका 22 वर्षीय युवतीने केला. मात्र, ती गावी पोहोचण्याऐवजी सोलापूर जिल्ह्यात गेली.
लॉकडाऊन परिस्थितीमुळे घरी कसे जायचे? असा प्रश्न तिच्यासमोर होता? या परिस्थितीत तिने मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सोलापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांशी संपर्क साधत संबंधित मुलीला लुगडेवाडी ता. पाटण या गावी तिच्या कुटुंबामध्ये सुखरुप पोहोच केली. यामुळे नागरिकांमधून मंत्री देसाई यांचे कौतुक होत आहे.
नोकरीनिमित्त ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या कुटूंबासह मुंबई, पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुंबई, पुणेस्थित लोकांची गावाकडे धाव वाढली आहे. एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनमुळे मिळेल त्या वाहनातून आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न मुंबई येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या एका युवतीने केला. ती पाटण तालुक्यातील लुगडेवाडी येथील रहिवाशी असल्याने तिला तिच्या घरी जायचे होते. मात्र, ती घरी न पोहोचता सोलापूर जिल्ह्यात गेली. यामुळे तिचे कुटुंबीयही मोठ्या चिंतेत होते.
बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यात व्यस्त असलेल्या युवतीला आपल्या विभागाचे आमदार शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री असल्याचे लक्षात आले. तीने क्षणाचाही विलंब न करता मंत्री देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनीही सोलापूर येथील जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित युवतीला तिच्या कुटुंबियांकडे सुखरूप पोहोचवले.