मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर छठ पुजेच्या सणासाठी बृहन्मुबई महानगरपालिकेने नियमावली जारी केली आहे. यानुसार मुंबईतले समुद्र किनारे आणि नदी किनाऱ्यांवर छठ पुजेला पालिकेने मनाई केली आहे.
छठ पुजेनिमित्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे करोनाप्रतिबंधासाठी आवश्यक परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या निमयासह इतर नियम पाळणे कठीण होईल, त्यामुळे हा निर्णय घेतल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र संबंधित अधिकारी कृत्रिम पाणवठ्याच्या ठिकाणी नागरिकांना मर्यादित संख्येने हा सण साजरा करायची परवानी देतील असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कृत्रिम पाणवठ्यांच्या ठिकाणी, पीपीई किट आणि चाचणी संचांच्या उपलब्धतेसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पथक तैनात केलेली असतील असेही ककाणी यांनी सांगितले.
छठ पुजेच्या विधींनुसार येत्या 20 नोव्हेंबरला सुर्यास्ताच्या वेळी आणि 21 नोव्हेंबरला सुर्योदयाच्या वेळी धार्मिक विधी होतील. यावेळी कुठेही गर्दी होणार नाही याची पोलीसांनी काळजी घ्यावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.