मनमानी कारभारामुळे देश आर्थिक संकटात

उदयनराजे भोसले यांची टीका

सातारा – सत्ताधाऱ्यांनी जनतेला विकासापासून, पोटभर अन्नापासून, रोजगारापासून, शिक्षणापासून, हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे वंचित या शब्दाचा मला तिटकारा आहे. सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सत्तांतर घडवून जोपर्यंत देशात परिवर्तन आणत नाही. तोपर्यंत घाणेरड्या सरकारची वळवळ थांबणार नाही, अशी टिका उदयनराजे यांनी केली.

तालुक्‍यातील मेढा व कुडाळ येथे प्रचारार्थ झालेल्या सभांमध्ये ते बोलत होते. आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, ऋषिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, सौरभ शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सुहास गिरी, रोहिणी निंबाळकर, रुपाली वारागडे, कांताताई सुतार, कांतीभाई देशमुख, मोहनराव कासुर्डे, हरिभाऊ शेलार, नारायण देशमुख, विजय सुतार आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जावली तालुक्‍याने 1999 मध्ये माथाडीच्या मुलाला आमदार केले, हे मी कधीच विसरणार नाही. दोन वेळा या तालुक्‍यातून निवडून गेलो. तसेच जिल्हा बॅंकेसह राज्याच्या राजकारणात पुढे गेलो. मात्र, ही सर्व भरारी जावळीच्या मावळ्यांमुळेच शक्‍य झाली. संघटनेत कधीही राजकारण करायचं नसते. हा शिरस्ता आम्ही जपला आहे. मात्र, विरोधी उमेदवाराने कोरेगावच्या सभेत वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील टीका केली.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आमच्या पूर्वजांसाठी ज्यांनी काम केले, त्यांच्यासाठी आज काम करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. जनता आपले आशिर्वाद मताच्या रुपाने उदयनराजेंना देऊन जावळीतून मताधिक्‍य मिळवून देईल. महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर खा. शरद पवार यांचे हात बळकट करावेत. गेल्या 5 वर्षांत सत्तेत नसतानाही सातारा-जावळीसाठी विकास निधी आणायला कुठेही कमी पडलो नाही. संघर्षातून प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व आमदार व खासदार उदयनराजे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता ही एकजुट कोणतीही शक्ती वेगळी करू शकत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.