…अखेर वाकुर्डेचे पाणी दक्षिणमांडला सोडले

तेरा गावांचा पाणी प्रश्‍न मिटणार : तात्पुरती टॅंकरची सोय; मसूर पूर्व भागाकडे मात्र दुर्लक्ष

मसूर पूर्व भागातही पाणीटंचाईचे सावट

कराड दक्षिण भागातील मनव गावाप्रमाणे कराड उत्तरमधील मसूर पूर्व भागातही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र या विभागाकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कराड दक्षिणप्रमाणेच येथील लोकांचा पाणी प्रश्‍न तत्काळ सोडवून पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्याची मागणी होत आहे.

कराड  – गत एक महिन्यापासून पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या मनव मधील ग्रामस्थांचा पाणीप्रश्‍न आता लवकरच मिटणार आहे. पंचायत समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या प्रस्तावानुसार शुक्रवार, दि. 12 रोजी वाकुर्डे योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बारा दिवसांनी मनव येथे दक्षिणमांड नदीला पोहोचणार असून या पाण्यामुळे परिसरातील तेरा गावांचा पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मनव व बामणवाडी येथे तात्पुरती टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

कराड तालुक्‍यातील दक्षिण मांड नदीवर पाटबंधारे विभागाकडून येणके, येळगाव, माटेकरवाडी, टाळगाव, घोगाव, येवती तसेच तुळसण आदी गावांमध्ये लघु/मध्यम पाटबंधारे तलाव बांधण्यात आले आहेत. त्याचबरोबरच वारणा पाटबंधारे प्रकल्पावरून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना देखील राबविण्यात आली असून या योजनेतील पाणी देखील दक्षिण मांड नदीमध्ये उपलब्ध करून दिल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटू शकतो. मात्र मनव गावामध्ये मार्च महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई भासू लागली होती. येथील लोकांना सर्व कामधंदा सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.

अनेकवेळा मागणी करूनही टॅंकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती. लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनव गावाला भेट देवून लवकरच पाणी प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन दिले. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये म्हटले आहे की, दक्षिण मांड नदीच्या परिसरातील एकूण तेरा गावामध्ये दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असते.

यावर्षीच्या पाणीटंचाई आराखड्यामध्ये तेरापैकी ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. अशा गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला असून सदर गावांसाठी सुचविलेल्या उपाययोजना व त्यासाठी येणारा अंदाजित खर्च हा 15.7 लाख इतका आहे. तथापी दक्षिणमांड नदीमध्ये वाकुर्डे, येणके, येळगाव व माटेकरवाडी या तलावातून पाणी सोडल्यास या गावांची पाणीटंचाई दूर होऊ शकेल.

दक्षिण मांड नदीकाठावरील एकूण तेरा गावांमध्ये 37 हजार 207 इतकी लोकसंख्या असून मोठे पशुधन 14 हजार 415 व लहान पशुधन 5931 इतके असून या सर्वांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. या प्रस्तावानुसार शुक्रवार, दि. 12 रोजी वाकुर्डे योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या येणपे येथील धरणापर्यंत योजनेचे पाणी पोहोचले असून साधारणत: दि. 23 पर्यंत दक्षिण मांड नदीला हे पाणी पोहोचेल, अशी माहिती पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.