फलटण -शहरातील सगुणामातानगर मलठण येथील बाळू गणपत देशपांडे (वय 50) यांचा त्यांच्या दोन्ही मुलांनी दारूच्या नशेत खून केल्याने फलटण शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सगुणामातानगर मलठण येथे जॉन डिअर ट्रॅक्टर शोरूमच्या समोरील झोपडपट्टीत राहणारे बाळू गणपत देशपांडे यांचा त्यांची मुले तेजस उर्फ सोन्याभाऊ देशपांडे, शिवतेज बाळू देशपांडे यांनी दारुच्या नशेमध्ये आज (मंगळवार दि. 20) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान खून केला.
झोपण्यापूर्वी त्यांची भांडणे वडील सोडवत होते. रात्री दोननंतर वडील व मुले एकत्र झोपली. आई त्याच घरात आतील बाजूला झोपली होती. पहाटे तीन वाजता आवाज आल्यानंतर आई उठली, त्यावेळी दोघे मुले टीव्ही लावून दंगा करत होती. देशपांडे बेशुद्ध होते. त्यांचा एक कान पूर्ण चेचला होता, त्या ठिकाणाहून रक्त येत होते. त्यांना पहाटे लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी ते मरण पावल्याचे घोषित केले.
दारूच्या नशेत बाळू देशपांडे यांना कोणत्या तरी कारणावरून वीट व इतर हत्याराने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. याबाबतची फिर्याद मृताची पत्नी नंदा बाळू देशपांडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.
त्यामध्ये वीट व इतर हत्यार याचा वापर करून मुलांनी वडिलांचा खून केला आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.