मुंबई : सध्या मुंबईत पहिली वुमेन्स प्रीमियर लीग सुरू आहे. यातील सामने रंगतदार होत असून, चाहत्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान, चाहत्यांनी असे काही नियम देखील पाहिले जे कदाचित टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच अंमलात आणले असतील. उदाहरणार्थ नो बॉल आणि वाइड साठी डीआरएस. वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये नो बॉल आणि वाइड्ससाठीही डीआरएस घेऊ शकता. यामुळे संघांना लाभ होत असून, अचूक निर्णयामुळे अटातटीच्या लढतीत संघांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे 31 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएलमध्येही हा नियम लागू केला जाऊ शकतो अशा बातम्या येत आहेत. जर हा नियम आयपीलमध्येही लागू करण्यात आला तर सामने मनोेरंजक होतील यात शंका नाही.
डब्ल्यूपीएलच्या नियमांनुसार, खेळाडूंना वाइड आणि नो बॉलला आव्हान देण्यासाठी डीआरएस वापरण्याची परवानगी आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, मुंबई इंडियन्सच्या हरमनप्रीत कौरने मैदानावरील पंचाच्या वाइड बॉलच्या निर्णयाद्वारे आव्हान दिले. यानंतर दिल्ली कॅपिटल्सची उपकर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने नो बॉलसाठी डीआरएस घेतला. या नव्या नियमाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.
टी-20 इतिहासात पहिल्यांदाच वाईड आणि नो बॉलसाठी डीआरएसचा वापर
टी-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच नो बॉल आणि वाईडसाठी डीआरएसचा नियम लागू करण्यात आला आहे. कोणत्याही खेळाडूला मग तो फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणातील असो, त्याला शंका असल्यास तो डीआरएस घेऊ शकतो. त्याचवेळी, पुरुषांच्या आयपीएलमध्येही हा नवा नियम लागू केला जाऊ शकतो, अशी बातमी येत आहे. एका क्रीडा संकेतस्थळाच्या अहवालानुसार, संघ आता पुरुषांच्या आयपीएलमध्येही नो बॉल आणि वाइड्ससाठी डीआरएस वापरण्यास सक्षम असतील.