मुंबई – स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या कमाल आर खानविरोधात मध्य प्रदेश न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. इंदूर जिल्हा न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात KRK विरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याचे समजते. केआरकेवर ही कारवाई चित्रपट अभिनेता मनोज बाजपेयी याने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी करण्यात आली आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मे रोजी होणार आहे. यापूर्वी न्यायालयाने केआरकेला अनेकवेळा हजर राहण्यास सांगितले होते आणि त्याच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.अशी माहिती मनोज वाजपेयी यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.
या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याच्या उद्देशाने केआरके न्यायालयात हजर होत नसल्याचे मनोज बाजपेयी यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी कोर्टाने केआरकेविरोधात वॉरंट जारी केले.
चित्रपट समीक्षकाच्या ट्विटच्या आधारे मनोज बाजपेयी यांनी केआरकेविरोधात हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. 2021 मध्ये केआरकेने मनोज वाजपेयींबाबत काही ट्विट केले होते, ज्यामध्ये केआरकेने मनोज वाजपेयी यांना ड्रग ऍडिक्ट म्हटले होते.
डिसेंबर 2022 मध्ये केआरकेने या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाने केआरकेची ही याचिका फेटाळून लावली होती. केआरकेच्या वकिलांनी कोर्टात दावा केला होता की, केआरकेने कधीच जाणीवपूर्वक मनोज वाजपेयींविरोधात ट्विट केले नाही.