‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा दुष्काळ

पालिकेचे दुर्लक्ष : भरपूर पाऊस होऊनही पाणी जमिनीत मुरले नाही


रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीवर दिली जाते बांधकामांना परवानगी, तरीही पालिकेकडे माहिती नाही

– प्रकाश गायकर

पिंपरी – यंदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाऊस चांगलाच बरसला. नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस बरसत होता. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे गणित काहीसे बदलले आहे, यामुळे पडलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन आणि साठा होणे भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्‍यक आहे. परंतु भरपूर पाऊस पडलेला असतानाही शहरात मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मात्र दुष्काळ दिसून आला.पावसाचे हे पाणी जमिनीत मुरावे तसेच शहरातील भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येते. त्यासाठी इमारत बांधताना महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. मात्र आतापर्यंत किती इमारतींना परवानगी देताना त्यांनी ही सिस्टिम बसवली आहे, याची आकडेवारी महापालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

शहरामध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई सुरू आहे. धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध असूनही प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार आणि राज्यकर्त्यांची उदासीनता यामुळे पाणीकपात सुरू आहे. मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर खालावली होती. शहरातील अनेक बोअरवेल आटले होते. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. शहरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. मार्च महिन्यामध्ये अनेक जलस्त्रोत आटतात. त्यामुळे शहराच्या उपनगरामध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवते.

शहरातील पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी जमिनीत पाणी मुरणे आवश्‍यक आहे. ही गरज पाहता घरघरांत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. परिपत्रक काढून नागरिकांना ही सिस्टीम बसविण्याचे आवाहन केले जात आहे. तर शहरात कोणत्याही नव्या बांधकामाची परवानगी घेताना ही सिस्टीम बसविणे बंधनकारक केले आहे. पिंपरी चिंचवड महपालिकेकडूनही याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी महापालिकेकडून गांभीर्यतेने केली जात नाही.

विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांकडे माहितीच नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यावर्षी सरासरी ओलांडून पाऊस बरसला. रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमच्या माध्यमातून हे पाणी जमिनीत न मुरता नाल्यावाटे वाहून गेले. त्यातच शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या कॉंक्रिटीकरणामुळे पाण्याला जमिनीत मुरण्यास वाहून गेले आणि पाणी साठविण्याची एक अनमोल संधी पाण्यासोबत वाहून गेली. याबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. ही सिस्टीम बसवून बांधकामाला परवानगी देणे तर दूरच मात्र अधिकाऱ्यांकडे याबाबत माहितीही उपलब्ध नाही.

लक्ष उत्पन्नाकडे, पर्यावरणाकडे नाही
रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम नसेल तर बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही, असा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता महापालिका प्रशासनाला आपल्या धोरणाचा विसर पडला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2019-20 या अर्थिक वर्षामध्ये 16 जानेवारी पर्यंत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. बांधकाम परवानगी विभागाला या बांधकामातून तब्बल 520 कोटींचा महसूल मिळाला. संबंधित विभागाचेही मोठे कौतुक झाले. बांधकाम परवानगी विभागाने पालिकेच्या तिजोरीत मोठी भर टाकली आहे. दरवर्षी हा विभाग उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठत आहे.

उत्पन्नाकडे काळजीपूर्वक लक्ष देणाऱ्या पालिकेला पर्यावरणाचा मात्र नेहमीप्रमाणे विसर पडतो. परवानगी दिलेल्या इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविली का? याकडे कुणाचेच लक्ष नाही. परवानगी देत असताना कुणालाही ही सिस्टीम बसविण्याची अट टाकली नाही. त्यामुळे नागरिकांनीही पाणी जमिनीत मुरविण्याकडे दुर्लक्ष केले. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने मनपाच्या शाळांच्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली आहे आणि त्यामुळे जमिनीत किती पाणी मुरले याचे आकडे देखील इसीए नावाच्या संस्थेला माहीत आहेत. परंतु एवढ्या मोठ्या पालिकेला शहरात किती रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नव्याने कार्यान्वित झाल्यात आणि किती पाणी मुरले, याची माहिती नाही.

जलस्रोत झपाट्याने आटत आहेत
शहरात बोअरवेलच्या माध्यमातूनही अनेक सोसायट्यांमधील घरांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. तसेच शहरामधून मुळा, मुठा व इंद्रायणी या नद्याही वाहतात. मात्र या नद्यांचे पात्र पावसाळा संपताच लहान होऊ लागते. तर बोअरवेलचेही पाणी कमी होते. शहरातील भोसरी, चिखली. तळवडे, देहूगाव या ठिकाणी विहीरी आहेत. मात्र जानेवारी महिन्यांमध्येच या विहीरींचे पाणी आटते. त्यामुळे पाऊस पडूनही केवळ गांभिर्याचा अभाव असल्याने भूजलपातळी खालावत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.