वॉशिंग्टन – ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी ड्रोन निर्यातीचे निकष मैत्रीसंबंध असलेल्या देशांसाठी अंशतः शिथिल केले. या नवीन धोरणानुसार ताशी 800 किलोमीटर वेगापेक्षा कमी वेगाने उडणारी ड्रोन “मिसाईल टेक्नोलॉजी कंट्रोल रेजीम’च्या अंतर्गत येणार नाहीत.
यामुळे अमेरिकेच्या मित्र देशांसाठीच्या संरक्षण क्षमतांसाठी ड्रोन निर्यात केली जाऊ शकणार आहेत. तसेच अमेरिकेतील ड्रोन उद्योगासाठी नवी बाजारपेठही खुली होईल, असे व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी प्रमुख केली मॅक्नरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या धोरणामुळे अमेरिकेच्या मित्रांना तातडीच्या संरक्षणासाठी ड्रोन मिळू शकतील. त्याचबरोबर “मिसाईल टेक्नोलॉजी कंट्रोल रेजीम’बाबत अमेरिका ठाम असून हे तंत्रज्ञान उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांना मिळू नये, याचीही काळजी घेतली जाईल. व्यापक हिंसाचरासाठी ड्रोनचा प्रसार होऊ नये, ही ट्रम्प प्रशासनाची भूमिका कायमच आहे, असे विदेश लष्करी व्यवहाराचे मंत्री क्लार्क कूपर यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत इंग्लंड, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांना अमेरिकन उत्पादकांकडून मोठे, सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याची परवानगी आहे.