जामखेड, (प्रतिनिधी)- आमदार रोहित पवार यांच्या प्रेरणेतून जवळा या ठिकाणी मोफत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची सुरुवात स्थानिक महिला व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.दुष्काळी परिस्थिती व पाण्याचे दुर्भिक्ष यातून जामखेड तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे.
पिण्याचे पाणी व जनावरांना पाणी यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. आटलेले बोअरवेल व विहिरींनी गाठलेला तळ यामुळे सध्या अडचणीची परिस्थिती जामखेड तालुक्यात जाणवत आहे.
या दुष्काळी परिस्थितीची समस्या लक्षात घेता ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे टँकरची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन आ. पवार यांनी स्वखर्चातून टँकर चालू करण्याचे आदेश दिले. दुसऱ्याच दिवशी टॅंकर सुरू करण्यात आले.
पुढील काळात टँकरची संख्या आणखी वाढवण्यात येईल, असे आश्वासनही आ. पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. जवळा गावचे ग्रामदैवत श्री जवळेश्वर महाराज यांच्या मंदिरासमोर या टँकरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँगेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे जवळा येथील पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला यांच्याहस्ते करण्यात आले.