खासदार सुळेंच्या दत्तक गावात दारूधंदे पुन्हा सुरू

प्रशासनाचे दुर्लक्ष, रणरागिणींचे उपोषण व्यर्थ

केडगाव – सांसद ग्राम गाव दापोडी (ता. दौंड) या ठिकाणी असणारे अवैध दारू धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले असल्याने हे धंदे बंद व्हावेत म्हणून मागील काही दिवसांपूर्वी गावातील महिला रणरागिणींनी केलेले उपोषण व्यर्थ गेले की काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

गावातील महिला सरपंचासहित इतर महिला रणरागिनींनी दापोडी गावातील कलानगर (वैदुवस्ती) आणि खोडवेवस्ती परिसरातील अवैध दारूधंदे बंद व्हावेत यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात 7 मार्च 2019 ला उपोषण केले होते; परंतु यवत (ता. दौंड) पोलीस कार्यालयाचे विद्यमान पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या ठिकाणी येऊन या पुढे गावात दारू विक्री होऊ दिली जाणार नाही, तसे आढळल्यास विक्री करणाऱ्या इसमावर तातडीने कारवाई करण्याची ग्वाही दिली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले होते; परंतु या ठिकाणी मागील काळात सुरू असणाऱ्या दारू धंद्यानी पुन्हा डोके वर काढले आहे, त्यामुळे महिलांचे उपोषण व्यर्थ गेले की काय, असा सूर सध्या आहे. शिवाय पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे पुन्हा दारूधंदा सुरू होणार नाही हे आश्‍वासन हवेतच विरले तर नाही ना, अशी शंकाही निर्माण होऊ लागली आहे.

गावाच्या नावाला गालबोट
दापोडी गाव खासदार सुप्रिया सुळे यांनी दत्तक घेतले होते. या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विकासकामांना मागील पाच वर्षात गती मिळाली आहे, त्यामुळे या गावाची वेगळी ओळख असताना अवैध दारू विक्री करण्याच्या प्रकारामुळे गावाच्या नावाला गालबोट लागत असून हे धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी पुढे येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.