महाराष्ट्रात तेही ग्रामीण भागात फक्त महिला चालवत असणारे पहिले कोविड सेंटर ज्यांनी सुरू केले… आणि नुसतेच सुरू न करता, एकही जीव न गमावता त्यातून सुमारे तीनशे करोना रुग्ण बरे करून पाठवले… ती रणरागिणी म्हणजे डॉ. शीतल उदय पवार…
समाजात करोना बाबत सगळीकडे भीतीचे वातावरण असताना साथीला तीन महिला डॉक्टर, आणि चौदा परिचारिका घेऊन शीतल पवार यांनी राजगुरूनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्याचे धाडस केले, हा काळ खरा कसोटीचा, डॉक्टरी पेशाचा कस पाहणारा होता. याच काळात डॉ. शीतल पवार व सहकऱ्यांनी अनेकांचे प्राण वाचवून डॉक्टर या पेशाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला.
करोना काळात त्यांनी खबरदारी म्हणून आपल्या मुलीला स्वतःपासून व वडीलांपासून बाजूला ठेवले. त्यांची सात वर्षांची मुलगी सई करोना काळात मातृ-पितृ प्रेमाला दुरावली; तरीही त्या डगमगल्या नाहीत. अनेक रुग्णांचे करोना काळात बरे झाल्यावर जाताना डोळे अश्रूंनी डबडबले, अनेकांनी अक्षरशः
डॉक्टरांचे पाय धरले. यावरून डॉक्टर आणि रुग्ण याचे नाते किती घट्ट झाले होते हे समजते. कोविड सेंटरमध्ये काम करीत असताना सहकारी डॉक्टर, नर्सेस यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. डॉ. शीतल पवार यांचे माहेरवाडा, तर सासर कोहिंडेगाव त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण राजगुरूनगर येथे झाले. तर डॉक्टर होण्याचे स्वप्न पुणे येथे पूर्ण झाले.
वयाच्या पाचव्या वर्षी डॉ. शीतल पवार यांचे एका अपघातात पितृ छत्र हरपले. पण परिचारिका असणाऱ्या त्यांच्या आई शोभा जाधव यांनी परिस्थितीशी दोन हात करत लेकीला जिद्दीने डॉक्टर बनवले. लेकीने ही आईच्या स्वप्नांचा उंच मनोरा बांधला जो आज पंचायत समिती खेड समोर ‘पवार हॉस्पिटल’ म्हणून दिमाखात उभा आहे. आणि अनेक गरजू रुग्णांची सेवा करत आहे. हे सगळे करत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून त्या हुतात्मा राजगुरू फाउंडेशन, अंनिस यांसारख्या सामाजिक संस्थांमध्ये आपले योगदान देत आहेत.
हे सगळे करत असताना त्यांच्या मागे एक व्यक्ती ठामपणे दीपस्तंभासारखी उभी राहिली ती व्यक्ती म्हणजे त्याचे पती डॉ. उदय पवार. सासूबाई सविंद्रा पवार, मावशी सरकारी वकील रजनी नाईक त्यांच्या शिवाय हा प्रवास शक्य नव्हता हे सांगायला त्या विसरत नाहीत.
काही माणसे नशीब घेऊन जन्माला येतात, तर काही दुःखाच्या कणखर कातळावर जिद्दीने यशाची पताका डौलाने फडकवतात. डॉ. शीतल पवार यांची गणना या दुसऱ्या प्रकारात करावी लागेल, म्हणून त्या वेगळ्या ठरतात. जणूं समाजभान असणाऱ्या त्या करोनायोद्धा असून आधुनिक नवदुर्गा आहेत.
शब्दांकन : चंद्रकांत बोऱ्हाडे, राजगुरूनगर
संकलन ः रामचंद्र सोनवणे, खेड तालुका प्रतिनिधी