दसऱ्याला सोनेखरेदीची सुवर्णसंधी

कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती ः सराफ दुकानदारांकडून आकर्षक ऑफर

पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा सण नव्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. विशेषतः दसऱ्याच्या दिवशी सोनेखरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळते. दोन महिन्यांच्या तुलनेत सोन्याचे भाव उतरले असल्याने सोने-चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढणार असल्याचा विश्‍वास व्यापाऱ्यांना आहे.

याच पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफ दुकानदारांनी विशेष ऑफर्स देऊ केल्या आहेत. सोने खरेदीवर तेवढीच चांदी फ्री, लकी ड्रॉ कूपन, आगाऊ बुकिंगवर सवलत, मजुरीवर डिस्काउंट, पैठणी साडी, वेढणीसाठी स्वतंत्र काउंटर यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदी खरेदीची उलाढाल वाढणार आहे.

एकीकडे करोना महामारीचे वातावरण आणि दुसरीकडे सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. तरीदेखील खात्रीची गुंतवणूक म्हणून भारतात सोनेखरेदीला प्रथम प्राधान्य दिले जाते. ऑगस्ट महिन्यात प्रति दहा ग्रॅमला 56 हजारांच्या पार गेलेला सोन्याचा दर आता 50 ते 51 हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे दसऱ्याला सुवर्णालंकारांची खरेदी वाढेल, असा विश्‍वास बाजारात व्यक्त होत आहे.

वेढणीच्या रूपात चोख सोने घेण्याबरोबर हलक्‍या, कमी वजनाच्या दागिन्यांची नवी व्हरायटी सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागात दागिने बनवून घेण्याकडे कल असल्याने बुकिंग करण्याकडे मोठा कल आहे. चांदीलाही चांगली मागणी आहे.

दिवाळीत भाव वाढण्याची शक्‍यता
दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर नेमके किती असणार, हासुद्धा अनेकांच्याच मनात घर करणारा प्रश्‍न आहे. ब्रोकर्स पोलच्या निरीक्षणातून एक लक्ष वेधणारी बाब समोर आली, ती म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर चांगलीच उंची गाठणार आहेत.

सध्याचा ऑक्‍टोबर आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी तफावत असणार आहे. या दरवाढीला आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे होणारे अवमूल्यनही कारणीभूत ठरत आहे. नोव्हेंबर महिन्यात होत असलेली अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूकही सोनेदरवाढीला कारण ठरू शकते.

साडेतीन मुहूर्तापैकी असणाऱ्या दसऱ्याला एक ग्रॅम का होईना, सोने खरेदी करणारे अनेक लोक आहेत. शिवाय दोन महिन्यांच्या तुलनेत सोन्याचे दर उतरले आहेत. अनलॉकनंतर लोकही खरेदीसाठी बाहेर पडलेत. अधिक मासामध्ये चांदीला मोठी मागणी राहिली. आताही मागणी वाझली आहे.
-सुनील शहाणे, अंबिका अलंकार मंचर (ता. आंबेगाव)

दरवाढ झाली तरी दरवर्षी दसऱ्याला सोनेखरेदीला ग्राहकांची गर्दी होते. सोन्याचे दर सध्या दोलायमान स्थितीत आहेत. गेलेला अधिक महिना आणि नवरात्रोत्सव यामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी झाली. गर्दीच्या शक्‍यतेने काही जणांनी दसऱ्याचे सोने आधीच बुकिंग केले आहे.
-परेश वाफगावकर, वाफगावकर ज्वेलर्स राजगुरूनगर (ता. खेड)

दरवषीप्रमाणे दसऱ्याला सोनेखरेदीसाठी गर्दी होतेच. यंदा कोविडच्या पार्श्‍वभूमीवर दुकानात विशेष काळजी घेतली आहे. तयार दागिन्यांना पसंती असली तरी काहीजण दागिने बनवून घेण्यास प्राधान्य देतात. अशा ग्राहकांना बुकिंग घेऊन घरपोच सेवा देत आहोत.
-मच्छिंद्र मुंडलिक, श्रीहरी ज्वेलर्स नारायणगाव (ता. जुन्नर)

प्रत्येक वर्षी घटस्थापनेपासून सोन्याला मागणी व सोने बुकिंग सुरू होत असते. यावर्षीही काही ग्राहकांनी सोने बुकिंग केले आहे. दसरा सणाच्या दिवशी देखील सोने खरेदीला नागरिकांची गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.
-सुनील शहाणे, श्रीराम ज्वेलर्स शिक्रापूर (ता. शिरूर)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.