राहुरी (प्रतिनिधी) – डॉ. तनपुरे कारखान्यातील बगॅसला शॉटसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या आगीमध्ये कारखान्याचा बगॅस मोठ्या प्रमाणात जळून भस्मसात झाला. यामध्ये कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तनपुरे कारखान्यात रात्री 8.30 च्या सुमारास शॉटसर्किट झाल्याने बगॅस पेटला. त्यानंतर राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले. त्यांनी कारखान्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी आग विझवण्यासाठी सुरक्षा अधिकारी बाळासाहेब तनपुरे, सुरक्षा कर्मचारी संजय घोगरे, बाळासाहेब धुमाळ, एकनाथ वरघूडे, अशोक गाडेकर, सुरेश आदमाने, पोपट नालकर, विठ्ठल म्हसे, इंद्रभान पेरणे, अशोक कदम यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य केले. कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक बी एन सरोदे यांनी सकाळी या नुकसानीची पाहणी केली. आग विझवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम व नगरसेवक आदिनाथ कराळे हे पहिल्यापासून हजर होते. त्यांनी मोलाची मदत केल्याबद्दल त्यांचेही कारखाना प्रशासनाच्यावतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.