नगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत 22 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात डॉ. नीलेश शेळके यांचे नाव समोर आले असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस त्यांना आता नगर अर्बनच्या गुन्ह्यात वर्ग करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
नगर अर्बन बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारी 2021 रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत. त्यात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक केल्या आरोपावरून कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरिया, यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे यांना अटक केली असून सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेले डॉ. नीलेश शेळके याचे नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात नाव आले आहे.
22 कोटींपैकी काही रक्कम डॉ. शेळके यांच्या खात्यावर गेली असल्याचे तपास निष्पन्न झाले आहे. तर, काही लोकांच्या खात्यावरही रक्कम गेल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डॉ. शेळके यांना अर्बन बँकेच्या गुन्ह्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
हे आहेत संशयित आरोपी…!
बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे पदच्युत संचालक मंडळ, अशी यातील संशयित आरोपींची नावे आहेत. यातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.