BJP Candidates 1st List: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी सादर केली आहे. या यादीत पक्षाने देशभरातील लोकसभेच्या 195 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात एकूण 28 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
या उमेदवारांच्या यादीत एक नाव चर्चेत आहे आणि ते नाव आहे डॉ. माधवी लता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हैदराबाद मतदारसंघातून डॉ. माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादच्या या जागेवर 1984 पासून ओवेसी कुटुंबाची सत्ता आहे. ओवेसी यांचे वडील सुलतान 1984 ते 2004 पर्यंत या जागेवरून खासदार होते.
असदुद्दीन ओवेसी हे 2004 पासून या जागेचे खासदार आहेत. यावेळी भाजपने ओवेसींच्या विरोधात डॉ.माधवी लता यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपने दिलेल्या उमेदवारीनंतर चर्चेत आलेल्या माधव लता नेमक्या कोण आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊयात.
कोण आहेत माधवी लता ?
डॉ. माधवी लता या तेलंगणातील विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय माधवी लता या हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत. त्या लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतमा फाऊंडेशनच्याही प्रमुख आहेत. त्यांनी हिंदुत्वावर दिलेली भाषणे चर्चेत आहेत. कोटी महिला कॉलेजातून त्यांनी राज्यशास्त्रातून एमए केलं आहे.
रुग्णालयाच्या चेअरपर्सन असलेल्या माधवी लता भरतनाट्यम नर्तिका देखील आहेत. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात. ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्या काम करतात. लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या त्या प्रमुख आहेत.
मागील निवडणुकीत भागवत राय यांचा पराभव
भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने हैदराबादमधून एका महिलेला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने भागवत राय यांना उमेदवार केले होते. पण ओवेसी यांच्याकडून भागवत राय यांचा सुमारे 3 लाख मतांनी पराभव झाला. त्यानंतर आता भाजपनेमाधवी लता यांना उमेदवारी दिली असून त्या ओवीसीच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवणार का? हे पाहावे लागणार आहे.