Siddharth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक केले जाते. सिद्धार्थचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या आगामी सिनेमाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच सिद्धार्थ ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे. यानिमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थने इनस्टाग्रामवर 25 फुटांच्या कटआऊटचा फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले की, “जाम भारी फिलिंग! लग्न कल्लोळच्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरच विश्वास बसत नाहीये. आज कोपरगावमध्ये लग्न कल्लोळचा प्रिमियर होता आणि थिएटरच्या बाहेर माझा 25 फुटाचा भला मोठा cutout उभारला गेला. त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला. (ते दूध प्रतिकात्मक होतं.. दूध वाया जाऊ नये म्हणुन ते दूध 500 विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं.) माझ्या 24 वर्षाच्या या छोट्याश्या कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडतंय. बापरे काय कमाल वाटत होतं.”
View this post on Instagram
“खरंच मयूर सर आणि संपुर्ण टीम चे मनापासून आभार.. मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशिर्वाद मिळतोय तो खरच स्वप्नवत आहे. लग्न कल्लोळला मिळणारा प्रतिसाद खुप भारी आहे.हा अभिषेक म्हणजे तुमच्यातल्याच एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे .Lv u all…असाच प्रेम असुदे!” या पोस्टद्वारे सिद्धार्थने आनंद व्यक्त केला आहे.
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थची ही पोस्ट चर्चेत आली असून अनेकांनी यावर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे. दरम्यान, सिद्धार्थचा ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यात सिद्धार्थसह मयुरी देशमुख आणि भूषण प्रधान हे कलाकार देखील आहेत.