नागपूर – इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे हे स्मारक अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले की, इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या पुतळ्याचे 18 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बेसमेंट वाढवायचे असल्याने काम थांबले होते. पण आता सविस्तर बैठक घेण्यात आली असल्याने स्मारकाचे काम लवकर पूर्ण केले जाईल.
या स्मारकाबाबत मुख्यमंत्री आढावा घेत असल्याने निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. या स्मारकाकरिता 266 कोटी खर्च झाले असून समाजकल्याण विभागाने यासाठी 366 कोटी रुपये म्हणजे 100 कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. या स्मारकासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली असल्याचे मंत्री सामंत यांनी उत्तरात सांगितले.