हडपसर(प्रतिनिधी) – प्रवाशांना जलद गतीने शहरात प्रवास करता येईल,या उद्देशाने बीआरटी प्रकल्प सुरू केला.त्याचा पहिला प्रयोग हडपसर येथे झाला.मात्र, झालेला हा प्रयोग पूर्णपणे स्पशेल फेल ठरला आहे. हाच बीआरटी मार्ग हडपसरवासीयांसाठी आता त्रासदायक ठरत आहे.आता अपघाती आणि त्रासदायक ठरलेल्या या बीआरटी मार्गाचे काय करणार आहात, असा प्रश्न हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत मांडला.
– बीआरटीच्या दुभाजकावर 103 कोटींचा खर्च कसा ?
– आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न
बीआरटीचा हडपसरवर प्रयोग झाला खरा ; पण, आम्हाला त्याचा काहीही उपयोग झाला नाही.सर्वसामान्य हडपसरकरांना ही बीआरटी त्रासदायक ठरली असून आमच्यासाठी बीआरटी म्हणजे ‘ बास रोजचा त्रास ‘ हीच भावना आहे, अशी खोचक टीकाही आमदार तुपे यांनी केली.
सध्या बीआरटी मधल्या दुभाजकावर नेहमीच अपघात होत असून कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. स्वारगेट ते कात्रज या पाच किलोमीटरच्या बीआरटीचा उपयोग फक्त सुशोभीकरणासाठी, बसथांबे करण्यासाठी झाला आहे . असेही आमदार चेतन तुपे यांनी परखडपणे सांगितले.
तब्बल 103 कोटी निव्वळ दुभाजकांसाठी खर्च करण्यात आले आहे का ? येथे रस्ता न बांधता दुभाजकावर इतका खर्च कसा करण्यात आला ? असा सवालही विधानसभेत उपस्थित केला.
तसेच या रस्त्यात नवीन उड्डाणपूल बांधले गेले आहेत. त्यामुळे बीआरटी मार्ग खंडित झाला आहे. केवळ दुभाजक असलेला बीआरटी मार्ग येथे उरला आहे.
सायकल ट्रॅक,पदपथ यावर अतिक्रमण झाले आहे. झालेले अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्यात यावे, अशी मागणीही तुपे यांनी यावेळी केली आहे.
#हिवाळीअधिवेशन2022 : नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन् वाहतूक कोंडी सोडवा – आमदार सुनिल टिंगरे
दरम्यान मध्यभागी असलेला सायकलस्वारांसाठीचा मार्ग बाजूला घेऊन सर्व्हिस रोड मध्ये करण्यात यावा यामुळे होणारे अपघात टळतील असा पर्याय सुचवत या सर्व मागण्यांचा विचार सभागृहाने करावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.