मंचर/पारगाव : धामणी (ता. आंबेगाव) येथे जबरी चोरीतील 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांकडून हस्तगत करत ज्येष्ठ दाम्पत्याकडे पुणे येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते सोमवारी (दि. 26) सुपूर्द करण्यात आले.
पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणी येथे 16 फेब्रुवारी 23 रोजी गोविंद भगवंत जाधव (वय 82) आणि नंदाबाई गोविंद जाधव या ज्येष्ठ दाम्पत्याला हातपाय बांधून, चाकूचा धाक दाखवत 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी हे वयस्कर असल्याने आणि त्यांना कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालत पाठपुरावा केला.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व पारगाव पोलीस ठाणे यांनी गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवत आरोपी रवींद्र भाऊसाहेब फड (वय 31), आकाश पांडुरंग फड (वय 26), नंदकुमार रामा पवार (वय 21), वैभव दिगंबर नागरे (वय 19, सर्व रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.
अटकेनंतर आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिली होती. यादरम्यान आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने ज्येष्ठ दाम्पत्यांना मुद्देमाल सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि. 26) पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते या दाम्पत्यांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती पारगाव पोलीस
ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.