शाळा, महाविद्यालयांना नगरसेविका सीमा सावळे यांचे निवेदन
पिंपरी – करोना लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र पगार कपात सुरू आहे. त्यामुळे बहुसंख्य पालक आर्थिक अडचणीत आहेत. असे असताना शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे शुल्क भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल अडवून ठेवण्याचा आडमुठेपणा काही शैक्षणिक संस्था चालकांकडून सुरू आहे. किमान परिस्थितीचे भान बाळगून संस्थाचालकांनी शैत्रणिक शुल्क वसुलीसाठी मुदत द्यायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत वार्षिक परिक्षांचे निकाल अडवून ठेवता येत नाहीत. जर कोणी पालकांना त्रास देत असतील तर अशा संस्था चालकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी दिला आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना त्या संदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या करोनाचा प्रसार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत शुल्क भरण्यासाठी खरे तर सवलत द्यायला पाहिजे.
लॉकडाऊनच्या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन शुल्क भरण्याचा पर्याय खुला करून द्यावा, असा आदेश शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक पालक आर्थिक संकटात सापडले आहेत. नोकरी करणाऱ्या पालकांच्या वेतनात 30 ते 50 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. तर व्यावसायिक असणाऱ्या पालकांना मागील दोन – तीन महिन्यात एका पैशाचेही उत्त्पन्न झालेले नाही. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालयांची फी भरणे पालकांना शक्य होणार नाही. त्यामुळे अशा सर्व पालकांना शुल्क भरण्यासाठी सवलत दिली पाहिजे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांबाबत पालकांच्या तक्रारी आहेत. शिक्षणाधिकारी यात म्हणावे असे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पालक मंडळी हतबल आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून संस्थांनी पालकांची अडवणूक करू नये, अन्यथा संस्थांच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशाराही सीमा सावळे यांनी दिला आहे.