पंचकुला – कुस्ती महासंघाच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. नवी कार्यकारिणी लोकशाही मार्गानेच निवडून आली आहे. कुस्तीपटूंना ज्या व्यक्तीच्या वागणुकीविषयी आक्षेप होते, ती व्यक्ती आता संघटनेत नाही.
त्या व्यक्तिविरोधातचे आरोप न्यायप्रविष्ट आहेत. शिवाय नवनियुक्त अध्यक्षांविषयी कसलेही आक्षेप नाहीत. असे असताना खेळाडू आवश्यकतेपक्षा जास्त व्यक्त होत असून, भावनेच्या भरात संन्यास घेणे अथवा पुरस्कार परत करत आहेत. हे योग्य नाही, असे प्रतिपादन हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी केले आहे.
ऑलिम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कुस्तीला अलविदा करण्याच्या निर्णयावर आणि टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या पद्मश्री परत करण्याच्या निर्णयावर चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंचकुलाच्या ताऊ देवी लाल स्टेडियमवर ८५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल टेनिस स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते.
रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने गुरुवारी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंगचा विश्वासू संजय सिंगच्या विजयाचा निषेध करत कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली. दुसरीकडे टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अव्वल कुस्तीपटूंनी वर्षाच्या सुरुवातीला ब्रिज भूषण यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली होती ज्यांच्यावर त्यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.