पक्ष सोडण्याच्या चर्चांना एकनाथ खडसेंकडून पूर्णविराम
नागपूरः विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते तसे त्यांच्या कृतीवरुनदेखील वारंवार दिसत होते. त्यातच ते आता पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनीच खुलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
नागुपरात कोणाचीही भेट घेतली नाही. या साऱ्या अफवा आहेत, विधानभवनात कामानिमित्त आलो आहे. मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही. माझे मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही. मी निर्णय घेतला असता तर वरिष्ठांवर मन वळवण्याचा प्रसंग आला असता. मी वरिष्ठांसोबत कायम संपर्कात असतो, असेही खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहेत. भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे नागपुरात दाखल झालेले असून, ते लवकरच शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील नागपुरात आहेत.
एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचे म्हटले होते.