पुणे – जन्मत:च मुक-बधीर असलेल्या दोन वर्षीय मुलांवर ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया केली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे लहानपणापासून आवाज हरपलेल्या मुलांना आवाजाची खरी जादू कळणार आहे. यावेळी दोन वेगवेगळ्या मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून, मुलांना आता एकू येणार, ते बोलू शकणार आहेत.
कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च आहे. मात्र, घरची परिस्थिती हालाकाची, एवढे पैसे आणायचे कोठून, शस्त्रक्रिया केली नाही तर, पोटची मुल आयुष्यभर बोलू शकणार नाही, त्यांना एकू येणार नाही. या विचाराने दोन्ही कुटुंबांतील पालक चिंताग्रस्त होते. शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकांकडे मदत मागितली. मात्र, ती मदतही पुरेशी नव्हती.
अशा परिस्थिती ससून रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होते, याची माहिती समजल्यावर दोन्ही कुटुंबांनी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. समीर जोशी यांची भेट घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी पालकांचे मार्गदर्शन करत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
एवढेच नव्हे तर या शस्त्रक्रियेसाठी कोणताही खर्च येणार नाही हे एकताच पालकांना धीर आला. त्यानंतर डॉ. जोशी यांच्याबरोबर डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. राहुल तेलंग, डॉ.संजय सोनवले, डॉ. सोनाली देवांग आणि डॉ. रुपाली बोरकर यांनी दोन्ही मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी डॉ. राहुल ठाकूर, डॉ. चेरी रॉय, डॉ. अफशान शेख, डॉ. जाई राऊल आणि डॉ. निहाल पडोळे, भूलतज्ञ डॉ. सुनिता खेडकर, डॉ. सविता पंडित यांच्यासह सिस्टर इनचार्ज निर्मला पवार यांनी शस्त्रक्रियेदरम्यान सहकार्य केले. यानंतर मुलांना पूर्नवसन आणि भाषा उच्चारासाठी मुग्धा म्हात्रे यांचे मार्गदर्शन असेल.