नवी दिल्ली – व्यक्तिगत भाल्याचा वापर कोणताही अन्य खेळाडू करू शकतो मग त्याला भालाचोरी कसे म्हणता. मी केवळ वापरून पाहण्यासाठीच पाकिस्तानी खेळाडूकडून भाला घेतला होता. तसेच त्या खेळाडूनेही माझा भाला घेत त्याचा वापरही केला होता. याला भालाचोरी म्हणत नाहीत. त्याबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे.
आधी या खेळाचे नियम समजून घ्या व त्यानंतरच निष्कर्ष काढा, अशा शब्दात टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचा सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा याने अनावश्यक मत व्यक्त करत असलेल्यांना सुनावले आहे.
माझ्या वक्तव्यांचा वापर आपल्या स्वर्थासाठी करू नका. खेळ आपल्या सगळ्यांना एकत्र यायला सुचवतो. जे काही घडले ते मी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणतेही मत व्यक्त करण्यापूर्वी या खेळाचे नियम समजून घ्या. सराव तसेच सामन्यापूर्वी भाला फेकण्यासाठी मी पाकिस्तानी खेळाडू नदीमकडून भाला घेतला, पण त्याला फार मोठा मुद्दा बनवण्यात आले. खरेतर हे या खेळात घडते, असे त्याने सांगितले.
आपल्या व्यक्तिगत भाल्याचा वापर सर्व खेळाडू करू शकतात. तसा नियमच आहे. त्यामुळे त्यात काही मोठी गोष्ट नाही. तो भाला घेऊन नदीम तयारी करत होता आणि माझ्या खेळावेळी मी त्याला तो भाला मागितला. तसेच अंतिम फेरी सुरू होण्यापूर्वी मी माझा भाला शोधत होतो. त्यावेळी पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम माझा भाला घेऊन जाताना दिसला. मी त्याला हा भाला माझा आहे मला परत दे, असे सांगितल्यावर त्याने तो लगेच परतही केला. यात काहीही गैर घडले नाही. त्यामुळे या घटनेला निराळा रंग देऊ नये, असेही निरजने खडसावले आहे.