बिजिंग – काबूलने सर्व दहशतवादी गटांपासून आपल्याला वेगळे करावे. तसेच अफगणिस्तानमध्ये समावेशक सरकार असावे, असे मत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात नुकतीच फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिनपिंग यांनी चीन रशियासोबत संवाद मजबूत करण्यासाठी तसेच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन व्यापक आंतरराष्ट्रीय समुदायासाठी तयार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अफगाणिस्तानमधील सर्व गटांशी सल्लामसलत करून खुली आणि सर्वसमावेशक राजकीय रचना तयार करण्यासाठी, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी, सर्व दहशतवादी गटांपासून पूर्णपणे विलग होण्यासाठी आणि इतर जगासोबत आणि खासकरुन शेजारील देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचे आवाहन जिनपिंग यांनी केले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्याच्या मुद्यावरुन चर्चा करत आपले मत मांडले.
पुतिन यांनी यावेळी अफगाणिस्तानातील स्थितीवर भाष्य करताना बाहेरील शक्ती जबरदस्ती आपले राजकीय मॉडेल काही देशांमध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असून ते काम करत नाही. यामुळे या देशांना फक्त विनाश आणि आपत्तीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले.