पुणे– करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या जागी दुखणे, अंगदुखी, किंचित ताप आल्यासारखे वाटणे, अशक्तपणा, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवत असल्याच्या तक्रारी लाभार्थींकडून केल्या जात आहेत. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर अशी लक्षणे जाणवल्यास पॅरासिटामॉल घ्या, दिवसभर आराम करा, हलका आहार घ्या, भरपूर पाणी प्या, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. शनिवारच्या लसीकरणानंतर किरकोळ स्वरुपाच्या “रिऍक्शन’ आल्याच्या तक्रारी काही लाभार्थींनी केल्या आहेत. मात्र, कोणत्याही लसीकरणानंतर सौम्य “रिऍक्शन’ जाणवू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
“त्या’ कर्मचाऱ्याला डिस्चार्ज…
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याला शनिवारी लस घेतल्यावर त्रास होऊ लागल्याने महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याला तीव्र स्वरुपाची लक्षणे नाहीत. रुग्णालयातर्फे उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. भारती यांनी सांगितले.
पॅरासिटामॉल हेच औषध
जिल्ह्यामध्ये 58 जणांना त्रास झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु त्यांना किरकोळ प्रकारचाच त्रास आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. केंद्र सरकारनेच कळवल्याप्रमाणे पॅरासिटामॉल हे त्यावरील औषध आहे. त्यामुळे तसे केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.
कोणतीही विषाणू प्रतिबंधक लस टोचल्यानंतर शरीरात “अँटिबॉडीज्’ निर्माण होतात. पण लसीतील प्रोटिनमुळे काही “रिऍक्शन’ही येऊ शकतात. त्यामुळे लस घेणाऱ्याला “फ्लू’सदृश लक्षणे जाणवू शकतात. अशावेळी पॅरासिटामॉल, बी-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमीन-सीच्या गोळ्या घ्या, दोन दिवस आमटी भात, डाळ-खिचडीसारखा हलका आहार घ्या, भरपूर पाणी प्या. शिवाय, खूप व्यायाम करू नका आणि अल्कोहोल घेऊ नका, त्यामुळे “साइड इफेक्ट’ वाढू शकतात.
– डॉ. विनोद शहा, लस घेतलेले डॉक्टर.
लस घेतल्यावर कणकण जाणवल्यास दिवसभर आराम करा, मात्र त्यानंतरही लक्षणे जाणवत असतील, तर लसीकरण केंद्र किंवा जवळच्या डॉक्टरांना दाखवा. मला लसीकरणानंतर काहीकाळ चक्कर येण्याचा त्रास झाला. परंतु तो नंतर कमी झाला. लस घेतल्यावर किरकोळ लक्षणे वगळता काहीही त्रास झाला नाही.
– डॉ. किरण महंकाळे, बालरोगतज्ज्ञ, कमला नेहरू रुग्णालय