जुने विषय घेऊन बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांना दिलासा

पुणे – अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेला बसण्याची सवलत राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. त्यामुळे जुने विषय घेऊन बारावी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीच हा नियम लागू असेल.

 

 

यंदापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखानिहाय गट ए, बी, सी यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून, काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. 8 ऑगस्ट 2019 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र, कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शिक्षकांनी जुन्याच विषय योजनेनुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. परिणामी, जे विषय अभ्यासक्रमातून वगळले आहेत, त्या विषयांची विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली. बारावी परीक्षेचे अर्ज भरतेवेळी ही बाब समोर आली. कारण जे विषय वगळण्यात आले होते.

 

 

ते विषय परीक्षा अर्जात समाविष्ट नव्हते. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विषय कसे निवडायचे? निवडलेल्या नवीन विषयांचा एक-दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला होता. बारावीसाठी अवेस्ता- पहलवी, सामान्यज्ञान, हिंदी उपयोजित, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, स्टेनाग्राफी हे विषय रद्द करण्यात आले होते. आता या विषयानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी देण्यात आली आहे.

 

 

तोच विषय घेऊन फेरपरीक्षेची संधी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.