नवी दिल्ली – राज्यात भ्रष्टाचाराचे प्रकार होत असतील तर सरकार त्याकडे मूक दर्शक बनून नुसतेच बघत बसणार नाही असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. ते म्हणाले की अशा प्रकरणात कठोर उपायोजना केली जाईल याची दक्षता संबंधीतांनी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
मागील सरकारच्याकाळात झालेल्या ४० टक्के कमिशनच्या आरोपांच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी चालकांना कामावर ठेवण्यासाठी लाच मागितल्याबद्दल विचारले असता, सिद्धरामय्या म्हणाले की त्यांच्याविरुद्ध चौकशी केली जाईल.
राज्यातील जात जनगणना अवैज्ञानिक असल्याच्या आरोपावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल सादर केलेला नाही, तरीही काही लोक आधीच हा अहवाल वैज्ञानिक नसल्याची टिप्पणी करत आहेत. अहवालातील तपशील जाणून न घेता अशी विधाने करणे योग्य नाही असे त्यांनी नमूद केले.