लॉकडाऊनमध्ये फी वसुलीचा तगादा लावू नका

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांचे शाळांना आदेश

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात आलेला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांकडून फी वसुलीसाठी तगादा लावू नये, असे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांना बजाविले आहेत.

करोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांकडे शाळांची फी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे. त्या वसुलीसाठी शाळांनी पालकांना ई-मेल, एसएमएस, फोन, व्हॉटस्‌ ऍप करण्याचा धडाका लावला आहे. ऑनलाइन फी भरण्याचे पर्यायही पालकांना उपलब्ध करून दिले आहेत.

मात्र, अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत पालकांकडे फी मागू नये, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांना दिले आहेत. फीबाबत पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांच्या विभाग, जिल्हानिहाय स्वतंत्र नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. यावर आता प्रत्यक्ष कारवाई काय केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही शाळा विद्यार्थ्यांकडून बळजबरीने फी वसूल करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आतापर्यंत चार शाळांबाबत पालकांचे फोन आले आहेत. त्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांनी सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची फी वसुली करू नये.
– डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प., पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.