सातारा – नवोदित वास्तुविशारदांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, नवकल्पना आणि कालातीत परंपरेचे संमिश्रण घडवून आणण्याच्या उद्देशाने यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये दरवर्षी प्रदर्शन भरवले जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ‘आयाम 2024’ हे प्रदर्शन उद्या, दि. 6 ते बुधवार, दि. 7 या कालावधीत यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये होणार आहे, अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य आर्किटेक्ट सुहास तळेकर यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सातारचे नगररचनाकार प्रमोद धनके यांच्या हस्ते होणार आहे. यशोदा इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, गणेश सुरवसे उपस्थित राहणार आहेत.
वास्तुशास्त्रीय परंपरांमध्ये अंतर्भूत असलेला समृद्ध वारसा आणि बुद्धिमत्तेचा सन्मान करताना, आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘आयाम’ हे प्रदर्शन भरवण्यात येते. विद्यार्थ्यांच्या कल्पना समाविष्ट करून घेणे आणि वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील अमर्याद शक्यतांचा शोध घेण्यास उद्युक्त करणे, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. हे प्रदर्शन यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये होणार आहे. यामध्ये प्रवेश विनामूल्य आणि सर्वांसाठी खुले आहे. सर्जनशीलता, संस्कृती आणि नावीन्याचा अनुभव घेण्यासाठी वास्तुविशारद आणि जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळेकर यांनी केले आहे.