अमेरिकन ओपन टेनिस : डॉमनिकने लिहीली विजयाची थिम

न्युयॉर्क – पहिले दोन सेट गमावल्यानंतरही आपला खेळ उंचावून नंतरचे तीनही सेट जिंकत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्‍झांडर ज्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. हे त्याचे कारकिर्दितील पहिलेच ग्रॅण्डस्लॅ विजेतेपद ठरले. हा सामना तब्बल 4 तास 2 मिनिटे चालला. गेल्या सात वर्षांत प्रथमच या स्पर्धेला नवा विजेता मिळाला. 

ज्वेरेव्हने या सामन्यात सुरवात धडाक्‍यात केली व पहिले दोन सेट अनुक्रमे 6-2, 6-4 असे जिंकले. त्यावेळी तो सहज विजेतेपद मिळवेल असे वाटत होते. मात्र, थिमने त्याचे स्वप्न भंग केले. उर्वरित तिनही सेट जिंकत कारकिर्दितील पहिलेच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. हा सामना थिमने 2-6, 4-6, 6-4, 6-3 व 7-6 असा जिंकला.

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दिग्गजांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने नोवाक जोकोवीच संभाव्य विजेता मानला जात होता. मात्र, लाइनवुमनला चेंडू मारुन गैरवर्तन केल्याने त्याची स्पर्धेतून गच्छंती केल्याने या स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्‍चित झाले होते. पहिले दोन सेट गमावल्यानंतरही सामना जिंकणारा थिम या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.