इंग्लंडची मालिकेत बरोबरी

मॅंचेस्टर – पहिला एकदिवसीय सामना जिंकून आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा नक्षा उतरवताना यजमान इंग्लंडने दुसरा सामना जिंकला व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी केली.

या सामन्यात इंग्लंडला केवळ 231 धावाच करता आल्या. पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एडम झम्पाने सरस गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांवर अकूश ठेवला. इंग्लंडकडून सर्वाधिक 42 धावा कर्णधार इयान मॉर्गनने केल्या. झम्पाने 36 धावांत 3 गडी बाद केले. ज्यो रूट, मॉर्गन व पहिल्या सामन्यातील शतकवीर सॅम बिलिंग्ज यांना बाद करत झम्पाने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

यावेळी ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकेल असे वाटत होते. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर वर्चस्व राखले. विजयासाठी 232 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्‍स आणि सॅम कुरेन यांच्या गोलंदाजीसमोर केवळ 207 धावाच करु शकला व इंग्लंडने हा सामना 24 धावांनी जिंकला.

वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्‍स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 10 षटकांत केवळ 34 धावा देत 3 बळी घेणारा आर्चर सामन्याचा मानकरी ठरला. या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक तिसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.