मल्हारपेठ – दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या पापर्डे खुर्द (ता. पाटण) गावात दि. 24 रोजी रात्री नऊच्या सुमारास जयवंत पाटील यांच्या घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. कुत्रे साखळीने बांधले असल्याने बिबट्यास ते घेऊन जाता आले नाही. पण, परत बिबट्या शिकार नेण्यास आल्याने बाहेरचा आवाज आला. घरातील लोक बाहेर येताच बिबट्याने डोंगराकडे पलायन केले. सध्या गावामध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण असल्याने शेती शिवारात जाण्यास लोक घाबरू लागले आहेत.
दिवशी बुद्रुक, पापर्डे, कोरिवळे, मारूल हवेली या डोंगरी दुर्गम भागात अन्नाच्या शोधात असणारा बिबट्या मानवी वस्तीपर्यंत येऊ लागला असून पाळीव प्राण्यावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्याच महिन्यात मारूल हवेलीमध्ये येथील माजी सरपंचाच्या घरातच बिबट्या घुसला होता. वन विभाग व नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन त्यास पकडण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, बिबट्या पसार झाला होता. काल झालेल्या कुत्र्यावरील हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.