चंदीगड – हरियाणाच्या सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मेकअप, “फंकी हेअरस्टाइल” लांब नखे ठेवण्यास तसेच टी-शर्ट, डेनिम आणि स्कर्टस, घालण्यास मनाई करण्यात आली असून रूग्णालय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने नवीन ड्रेस कोड तयार केला आहे. हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य सरकारने तयार केलेला ड्रेस कोड अंतिम टप्प्यात आहे.
ऑन-ड्युटी कर्मचाऱ्यांनी दिवसाचे 24 तास ड्रेस कोडचे पालन केले पाहिजे, ज्यात शनिवार व रविवार, संध्याकाळ आणि रात्रीच्या शिफ्टचा समावेश आहे, असे ते म्हणाले. ड्रेस कोडचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरहजर म्हणून कामावर नोंद केली जाणार आहे. मंत्री म्हणाले की रुग्णालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट आचारांचे पालन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ड्रेस कोड हा एक आवश्यक घटक आहे.
आरोग्य केंद्राच्या कामाच्या वेळेत फंकी हेअरस्टाइल, जड दागिने, ऍक्सेसरीज, मेकअप, लांब नखे हे अस्वीकार्य आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की कोणत्याही रंगाची जीन्स, डेनिम स्कर्ट आणि डेनिम कपडे हे व्यावसायिक कपडे मानले जात नाहीत आणि म्हणून त्यांना परवानगी दिली जाणार नाही. कर्मचाऱ्यांना त्यांचे पद घोषित करणारा नावाचा बिल्ला आपल्या पोशाखावर लावावा लागेल. तसेच रूग्णालयांमध्ये स्वेटशर्ट, स्वेटसूट आणि शॉर्टसला परवानगी नाही.
स्लॅक्स, स्कर्ट आणि पॅलाझो यांना देखील परवानगी नाही. टी-शर्ट, स्ट्रेच टी-शर्ट, स्ट्रेच पॅंट, फिटिंग पॅंट, लेदर पॅंट, स्वेटपॅंट, टॅंक टॉप, क्रॉप टॉप, ऑफ-शोल्डर ड्रेस, स्नीकर्स, चप्पल इत्यादींना परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे पादत्राणे काळे, स्वच्छ, आरामदायक आणि फंकी डिझाईन्सपासून मुक्त असले पाहिजेत,असेही मंत्र्यांनी म्हटले आहे.