शिवसैनिकांची अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक ः माजी आमदार गोरेंकडून मध्यस्थी
राजगुरुनगर -शासनाचा पगार घेता की विद्यमान आमदारांचा? असा थेट सवाल करून शिवसेनेचे कार्यकर्ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर जवळपास धावून गेलेच होते. मात्र अधिकारी थोडक्यात बचावल्याची घटना खेड पंचायत समितीत शुक्रवारी (दि. 14) अनुभवायला मिळाली. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे घटनास्थळी होते; अन्यथा पंचायत समितीत सत्तेत असलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला असता, अशी खळबळजनक चर्चा नंतर तालुकाभर पसरली.
खेड पंचायत समितीच्या वाडा रस्त्यावरील दक्षिण बाजूच्या मोकळ्या जागेत नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे. त्यासाठी शासनाचा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच विधानसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झाले. पंचायत समितीत शिवसेनेचे 14 पैकी 10 सदस्य आहेत. अंकुश राक्षे सभापती आणि ज्योती आरगडे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. सत्ता काळात ही इमारत पूर्ण व्हावी अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ठेकेदाराला काम मिळाले असून विविध परवानग्यासुद्धा झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत बदल झाल्यावर श्रेयवाद उफाळून आल्याची चर्चा काही दिवस होती. त्यातच आमदार दिलीप मोहिते अधिकाऱ्यांना हाताशी धरून खो घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची विरोधी गटात चर्चा आहे.
आठ दिवसांत काम सुरु केले नाही तर तोंडाला काळे फासू. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू, असा थेट इशारा तालुकाप्रमुख रामदास धनवटे, सुरेश चव्हाण, विजया शिंदे, उपसभापती ज्योती आरगडे आदींनी दिला. हे सर्व बोलण्यासाठी कार्यकर्ते वाजे यांच्यावर अक्षरश: तुटून पडले. माजी आमदार गोरे यांनी कार्यकर्त्यांना सावरले. इमारतीच्या कामाला पुढील शुक्रवारी सुरुवात न झाल्यास तीव्र पडसाद उमटतील असा इशारा दिला. उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अमर कांबळे, मच्छिंद्र गावडे, सुनीता सांडभोर, प्रकाश वाडेकर, किशोर शेवकरी, सुनील टाकळकर, केशव आरगडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहितेंचा दबाव
बैठका, चर्चामधून मार्ग निघत नसल्याने तालुक्यातील सेना पदाधिकारी आणि माजी आमदार सुरेश गोरे यांनी समितीत शुक्रवारी (दि. 14) सकाळी कार्यकर्त्यांसह हजेरी लावली. निवेदन द्यायचे होते; मात्र प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते. हे पाहून कार्यकर्त्यांचा पारा चढला. सह गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे आणि शाखा अभियंता बाळासाहेब वाजे हे संतप्त पदाधिकाऱ्यांना सामोरे गेले. नूतन इमारतीचे काम निविदा प्रक्रिया होऊन सुद्धा सहा महिने प्रलंबित का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर माहिती देताना वाजे यांनी आमदार दिलीप मोहिते यांचा दबाव असून त्यामुळे कामात विलंब होत असल्याचे कारण सांगून टाकले. त्यावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते चिडले. प्रशासकीय काम करताना शासनाचा पगार घेता आणि आमदारांचा, दबाव सांगता? त्यांच्याकडे कामाला आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.