मुंबई – मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. मात्र असं असतानाच आता ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा करोना विषाणू अक्षरशः धुमाकूळ घालत असून यामुळे देशातील सरकारी यंत्रणा हायअलर्टवर आहेत.
करोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे काय? याबाबत सध्या जोरदार तपासणी सुरु असून याचीच प्रचिती मुंबई पोलिसांनी आज पहाटे केलेल्या कारवाईतून आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारकडून पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना करोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
असं असतानाही मुंबईत एका क्लबमध्ये करोना नियमांचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत आढळल्याने एका माजी भारतीय क्रिकेटपटूसह इतर काही सेलिब्रेटी अशा एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.”
ही कारवाई मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता करण्यात आली. पोलिसांची ही कारवाई म्हणजे ३१ डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना सूचक इशाराचं म्हणावा लागेल.
मुंबई पोलिसांतर्फे या कारवाईबाबतचे एक ट्विटही करण्यात आले असून यामध्ये पोलिसांनी, ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’ असा सणसणीत इशारा दिला आहे.
Party (Nahin) Chalegi Till Six In The Morning!
A raid was conducted at a nightclub in Andheri at around 3 am, for flouting COVID prevention norms
Action has been initiated against 34 people, out of which 19 were from Delhi & Punjab, including some celebrities #NewNormal
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 22, 2020