भारतीयांसाठी सकाळ तर चीन जपानसाठी संध्याकाळ
वॉशिंग्टन : स्नान करणे हे कोणत्याही देशातील जीवनशैलीतील एक दैनंदिन भाग असला तरी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या नियमांचा आणि काळाचा अवलंब केला जातो. साहजिकच स्नान करण्यासाठी निश्चित वेळ कोणती याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. कारण भारत आणि युरोपमधील देश सर्वसाधारणपणे सकाळी स्नान करून कामाला लागतात पण चीन जपान आणि इतर काही देशांमध्ये मात्र दिवसभर काम करून रात्री स्नान करण्याचा प्रघात लोकप्रिय झाला आहे.
अर्थात ज्या जीवनशैलीमध्ये दिवसभरात दोन पेक्षा जास्त वेळ स्नान करण्याची शैली लोकप्रिय झाली आहे त्यामध्ये सकाळ संध्याकाळ आणि रात्री सुद्धा स्नान करण्याची प्रथा आहे. भारत अमेरिका कॅनडा आणि युरोपमधील देशांमध्ये सकाळी ताजेतवाने होण्यासाठी सकाळच्या वेळेमध्येच स्नान करण्याला प्राधान्य दिले जाते. पण चीन जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये मात्र दिवसभर काम केल्यानंतर थकवा घालवण्यासाठी रात्री स्नान करण्याला प्राधान्य दिले जाते.
दिवसभर आपण बाहेर वावरत असताना ज्या नकारात्मक शक्तींचा आपल्यावर प्रभाव होतो तो प्रभाव कमी करण्यासाठी बाहेरून घरात आल्यानंतर रात्री स्नान करणे सर्वात चांगले असते असे चिनी लोकांना वाटते तर जपानी नागरिकांच्या मते रात्री स्नान केल्यामुळे झोप चांगली लागते आणि दुसरा दिवसही चांगला जातो. अर्थात सकाळी किंवा रात्री स्नान करण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे असले तरी या विषयातील तज्ञांनी मात्र सकाळपेक्षा रात्री स्नान करणे जास्त फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.