जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार या छोट्याशा दुर्गम खेड्यात राहणाऱ्या शितलदेवी या सोळा वर्षाच्या मुलीने तिरंदाजीत असामान्य कौशल्य प्राप्त केले आहे. तिला जन्मताच दोन्ही हात नव्हते. या दुर्मिळ प्रकाराला ‘फोसेमेलीया’ असे म्हणतात. मात्र, दोन्ही हात नसले म्हणून ती कुणाला दोष देत बसली नाही.
जबरदस्त जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठीचा कमालीचा संघर्ष यातून तावून सुलाखून निघालेल्या शितलदेवीने झेक प्रजासत्ताका नुकत्याच झालेल्या दिव्यांगांसाठीच्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक खेचून आणले आहे. खेड्यातील अतिशय कष्टप्रद जीवन ते आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात असाधारण चमक दाखवणाऱी शितलदेवी ही आजच्या घडीला सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरते. मानवी जिद्द आणि आणि प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी असाधारण कष्ट करण्याची तयारी असली की काय घडते हे आपल्याला शितलदेवीकडे पाहून लक्षात येते.
तिच्याकडे असणारी जबरदस्त चिकाटी आणि तिने जे असाधारण यश मिळवले आहे. ते निश्चितच प्रेरणादायी असे आहे. दुर्गम पहाडी गावात राहताना रोजच्या जगण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. याबद्दल कुठलीही तक्रार न करता शितलदेवीने स्वतःमधील जिद्दीला साथ घालून मनात प्रखर अग्नी पेटवला. त्यातूनच आज ती एक यशस्वी दिव्यांग खेळाडू म्हणून पुढे आलेली आहे. 2019 मध्ये भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे लक्ष तिच्याकडे गेले. त्यावेळी मुघल मैदानावर तरुणांसाठीचा कार्यक्रम चालू होता. त्या ठिकाणी तिच्यातील असाधारण गुणवत्ता आणि जिद्द पाहून भारतीय लष्कराने तिला आपल्या छत्रछायेखाली घेतले.
तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले. त्याखेरीज सर्व ती वैद्यकीय मदतही देऊ केली. बंगळुरू येथील श्रीमती मेघना गिरीश, अभिनेता अनुपम खेर आणि द बीइंग यू या स्वयंसेवी संस्थेने तिच्यासाठी खूप मेहनत घेतली. आता तिला बायोनिक आर्म्स बसवण्यात आले असून त्याद्वारे जिंकण्यासाठी तिला नवा मार्ग गवसलेला आहे. तिचे वडील शेतकरी आहेत आणि तिची आई मेंढी पालनाचा व्यवसाय करते. 2022 मध्ये ती कटरा येथील वैष्णोदेवी देवस्थान समितीच्या तिरंदाजी अकादमीत दाखल झाली. केवळ सहाच महिन्यात तिने तिरंदाजीत अतिशय सहजता प्राप्त केली आणि ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.
तिरंदाजीसाठीचे राष्ट्रीय प्रशिक्षक (पॅराऑलिंपिक) कुलदीप बैद्वान यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तिरंदाजीचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेतले आणि तिरंदाजीतील कौशल्य आत्मसात केले. छातीचा आणि पायाचा वापर करून ती धनुष्यावर लावलेला बाण व्यवस्थित खेचून सोडू शकेल. यासाठी विशेष धनुष्याची निर्मिती करण्यात आली आहे.
2022 मध्ये तिने कनिष्ठ गटातील खुल्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतला आणि नेहमीच्या सक्षम खेळाडूंसोबत स्पर्धा करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर खेलो इंडिया नॅशनल आणि वुमेन्स खेलो इंडिया गेम्स मध्ये देखील तिने भाग घेतला होता. अनेक राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांमध्ये तिने स्वतःची क्षमता सिद्ध केली. त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंदाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
झेक रिपब्लिक या ठिकाणी झालेल्या दिव्यांगांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत तिने असाधारण कामगिरी करताना रौप्य पदक प्राप्त केल. अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी करणारी ती जगातील हात नसणारी पहिलीच महिला तिरंदाज आहे. झेक प्रजासत्ताकातील स्पर्धेत रौप्य पदक मिळवण्याच्या तिच्या कामगिरीमुळे आता 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणाऱ्या आगामी पॅराऑलिंपिक्स स्पर्धेतील तिची जागा नक्की झालेली आहे.