मूल जन्माला आले की एकूण वातावरणाशी आणि आजुबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागतो. साधारणपणे लहान मूल संवेदनशील असल्याने त्याला कोणताही संसर्ग पटकन होण्याची शक्यता असते. मग घरातील हे चिमुकले आजारी पडले की संपूर्ण घरच काळजीत पडते.
घरातील सर्वांचे लाडके असणारे हे बाळ आजारी पडले की किरकिर करते आणि शांत होऊन जाते, असे होऊ नये यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यामुळे या बाळाची योग्य पद्धतीने काळजी घेतलेली केव्हाही चांगली. तेव्हा बाळाची काळजी कशी घ्यायची याविषयीच्या काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे…
बाळाला ऊब मिळेल असे वातावरण ठेवा आईच्या पोटात असताना बाळ खूप ऊबेत असते. त्यामुळे जन्मानंतर त्याला वातावरण खूप थंड वाटू शकते. तसेच कान, नाक, त्वचा सगळेच अतिशय नाजूक असल्याने त्याला जास्त थंडी वाजण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आणि एरवीही बाळाला जास्तीत जास्त ऊब मिळेल असे पाहा. यासाठी शरीरासोबतच त्याचे पाय, हात, डोके कपड्याने झाकलेले राहील असे पाहा. तसेच आईची ऊब ही बाळासाठी सर्वाधिक जवळची वाटणारी ऊब असते. त्यामुळे ते लहान असताना आईच्या ऊबेत जास्तीत जास्त राहील असे पाहा.
हात कायम स्वच्छ ठेवा नवजात बाळाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी किंवा संसर्ग लगेच होऊ शकतो. आपण दिवसभरात अनेक गोष्टींना हात लावत असतो, त्यावर बरेच जीवाणू, विषाणू असण्याची शक्यता असते. यामुळे बाळाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्याला हातात घेताना हात पाण्याने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ केलेले असतील याची काळजी घ्या.
कोणीही बाळाचा सतत मुका घेणार नाही याची काळजी घ्या कोणत्याही व्यक्तीने बाळाला सतत मिठीत घेणे किंवा सतत त्याचा मुका घेणे बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे बाळाला भेटायला येणारे लोक अतिशय प्रेमाने त्याला जवळ घेत असतील तरीही ते जास्त काळ मुका घेणार नाहीत याची काळजी घ्या. वेळप्रसंगी बाळाच्या चांगल्या प्रकृतीसाठी त्यांना तसे थेट सांगण्यास मागेपुढे पाहू नका.
बाळाला किमान 6 महिने स्तनपान द्या स्तनपान हे बाळासाठी जन्मापासून अमृतासारखेच काम करत असते. हे एकमेव अन्न असते ज्यातून बाळाचे पोषण होत असते. त्यामुळे हे अन्न बाळाला किमान 6 महिने मिळावे असा आग्रह राहायला हवा. जास्तीत जास्त स्तनपान दिल्याने बाळाची तब्येत तर सुधारतेच, पण त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
बाळाचे कपडे वेगळे धुवा बाळाची तब्येत चांगली ठेवायची असेल आणि त्याचे आजुबाजूचे वातावरण पोषक राहील याची काळजी घ्यायची असेल तर स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. बाळाचे कपडे हे इतर कपड्यांसोबत न धुता ते वेगळे धुणे गरजेचे असते. त्यामुळे इतर कपड्यांमधून त्याला कोणताही संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.