नाभीपिडासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे. या आसनात प्रथम बैठक स्थिती घ्यावी. मग दोन्ही पाय लांब करावेत, म्हणजेच दोन्ही पायात अंतर घ्यावे. मग दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून बसल्याजागी दोन्ही पावले एकमेकांवर ठेवून पावलांची नमस्कार स्थिती घ्यावी.
मग ही दोन्ही पावले हवेत उचलावीत आणि नाभीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी पावले एकमेकांवर ठेवलेलीच असावीत. पावले नाभीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. हे एक तोलात्मक आसन आहे. यामध्ये थोडा वेळ स्थिर राहता येते, पण नियमित सरावाने तसेच समोरील वस्तूवर लक्ष केंद्रित करून आपण आसन काही काळ टिकवू शकतो.
हे आसन करताना जवळ योगशिक्षक असणे आवश्यक आहे. कारण तोलात्मक आसन असल्याने तोल जाऊन पडण्याची शक्यता असते. या आसनामुळे हातपाय मजबूत होतात. पोटातील वायू सरकायला मदत होते. त्यामुळे गॅसेस तसेच गुद्दद्वाराच्या अडचणी बऱ्या होण्यास मदत होते.
पुरुषांना वीर्यशक्ती प्राप्त होते. नाभीजवळील ग्रंथींचे कार्य सुधारायला मदत होते. हे आसन नियमित केल्याने पाचकरस चांगल्याप्रकारे स्रवू लागतात आणि पचन सुधारते. फक्त या आसनात तोल जाण्याचा संभव असल्याने आसन करताना काळजी घ्यावी. योग्य योगशिक्षक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन नियमित करावे. सुरुवातीला आसन टिकवण्याचा कालावधी 15 सेकंद ठेवावा मग हळूहळू वाढवता येतो.