पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे आवाहन
मंचर – नायजेरिएन नागरिक व देशातील काही टोळ्या ऑनलाइन फसवणुकीत अग्रेसर आहेत. अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे शहरी व ग्रामीण भागात घडतात. अतिशय गोड बोलून तुमचे बॅंक खाते बंद होईल, तुम्ही आधारकार्ड, बॅंक खाते क्रमांक, एटीम पीनचा पासवर्ड आदी माहिती विचारतात आणि तेथेच नागरिक फसतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बॅंक अकाउंटची माहिती कोणालाही फोनवर देऊ नये, असे आवाहन नवी मुंबई येथील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रपती पदक घोषित झालेले सुरेश मेंगडे यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला. बाजार समिती, शरद बॅंक, खरेदी विक्री संघ या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे बोलत होते. कार्यक्रमात शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, बाजार समितीचे उपसभापती संजय शेळके, संचालक गणपतराव इंदोरे, सागर थोरात, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, बाळासाहेब मेंगडे, शरद बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जोत्स्ना काकडे, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.