आजअखेर तीन उमेदवारांनी भरले चार अर्ज
जुन्नर -जुन्नर विधानसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात दोन वेळा पक्षाच्या एबी फॉर्मपासून वंचित राहिलेले शरद सोनवणे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नगराध्यक्ष शाम पांडे, पंचायत समितीचे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना आमदार सोनवणे यांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भागला, तर मी एबी फॉर्मसाठी 15 वर्षे वाट पाहिली, अखेर मला न्याय मिळाला. आता राज्यात जुन्नर तालुका एक नंबर करायचा आहे.
शरद सोनवणे यांच्यामुळे महाराष्ट्रात जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका जाहिर झाला. त्यांच्या काम करण्याची धमक असल्याने जुन्नर तालुक्याला मानाचं पद मिळालं पाहिजे, ती मिळवून देण्याची तयारी माझी आहे, असा शब्द शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
- आशा बुचके यांचा अर्ज दाखल
दरम्यान, जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंत 16 जणांनी 25 अर्ज नेले असून, आज सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके तसेच सुखदेव खरात यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.