पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती व अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ‘कोविड व्यवस्थापन व नियोजना’बाबत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी
उपस्थित होते.
पवार म्हणाले, यावर्षी करोनाचे संकट असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनदेखील साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.