पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाइट्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, यामुळे एका तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आले आहे, अशी माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी दिली.
जनता वसाहत येथील अनिकेत हा 23 वर्षीय व्यक्ती पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. नाचत असताना हिरवा लेजर लाइट त्याच्या एका डोळ्यावर पडला. त्याला डोळ्याला काही वेदना, आग झाली नाही. परंतु, त्याची दृष्टी मात्र अंधुक झाली. यानंतर सिंहगड रस्त्यावरील दूधभाते नेत्रालयात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी त्याच्यावर उपचार केले.
अनिकेतच्या डोळ्यावर लेजर लाइट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावरील रेटिनावर बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे. तसेच अनिकेतसारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाला दाखवावे. हा लेझर लाइट टाळावा. या लेझर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम होतील, असे डॉ. दूधभाते यांनी सांगितले.
‘लेझर बर्न’ म्हणजे नेमके काय?
डी.जे.सोबत चालवल्या जाणाऱ्या हिरव्या लेझर लाइटची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. जे युवक त्या लेझर फ्रिक्वेन्सीच्या “फोकल लेंग्थ’वर आले किंवा त्यांचे नेत्रपटलवर आले; तर त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागते. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेसरने या तरुणाईवर केला आहे.