जिल्हा पोलीस प्रमुखांकडून सुट्ट्यांची भेट; 29 प्रभारींनीही घेतला आनंद
सातारा – नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या सातारा जिल्हा पोलिसांना कोणताच सण कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही. मात्र, यंदा पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्ताचे परफेक्ट नियोजन करून पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील 29 पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिवाळीची सुट्टी दिल्याने पोलीस दलात आनदांचे वातावरण निर्माण आहे. कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करता आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता नव्या जोमाने कामाला सुरूवात केली आहे.
कोणताही सण आला की पोलिसांना त्याचे काहीच वटत नाही. कारण सण म्हणजे त्यांच्यासाठी केवळ बंदोबस्तच असे समीकरण गेली अनेक वर्षे तयार झाले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळीही अशीच बंदोबस्तात जाणार अशी मनाची तयारी करून कामाला लागलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना एसपींच्या दिवाळी भेटीने आकाश ठेंगणे झाले.
एरवी एसपींचा अथवा त्यांच्या कार्यालयातून फोन आला की, काही काम मागे लागणार असा समज झालेल्या अधिकाऱ्यांना तेजस्वी सातपुते यांनी यावेळी आश्चर्याचा धक्का दिला. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना एसपींनी फोन करून तुम्ही दिवाळीची सुट्टी घ्या असा संदेश दिला.
केवळ सुट्टीचा संदेश न देता एसपींनी त्या अधिकाऱ्यांच्या सुट्टी काळात त्या-त्या पोलीस ठाण्यच्या कारभाराची सुत्रेही समकक्ष अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने कायदा सुव्यवस्थाही अबाधित राहिला आणि सणाला सुट्टी मिळाल्याने अधिकाऱ्यांची मानसिकताही चांगली राहिली.
एसपी म्हटले की कायम सुट्ट्या बंदचा आदेश काढणारी व्यक्ती असा अनुभव आजवर सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा. पण तेजस्वी सातपुते यांनी अखेर हा अनुभव इतिहासजमा करून पोलीस दलात चैत्यन्याचे वातावरण निर्माण केल्याने निश्चित पोलीस दलातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या भावना दिसून आल्या.
दिवाळी अन् भाऊबीजेची भेट
जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी महिला कर्मचाऱ्यांना सुट्टीसोबतच दिवाळीची भेट म्हणून साडी अन् मिठाईची भेट दिली होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील 29 प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना अनपेक्षीत सुट्टी देत त्यांना भाऊबीजेची भेट दिल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.
अधिकाऱ्यांना सुट्टी अन् स्वत: मात्र साताऱ्यातच
एखाद्या कुटुंबांचे प्रमुख असणे म्हणजे किती जिकीरीचे काम असते हे अनेकदा दिसून आले. कारण त्या कुटुंबातील चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीला कुटुंबप्रमुखच जबाबदार असतो अन् त्यात पोलीस दलाचे प्रमुख असणे म्हणजे तारेवरची कसरतच. पण या सगळ्या गोष्टींना बगल देत, जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या निकालाने वातावरण तापलेले असताना ऐन दिवाळीत सुट्टी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. असे असले तरी सर्वांना सुट्टी दिल्यानंतर तेजस्वी सातपुते याही सुट्टी घेतील असे वाटत असताना त्यांनी मात्र, कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवत साताऱ्यातील शासकीय निवासातच दिवाळी साजरी केली.